नवी दिल्ली- कथित दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी मनीष सिसोदिया यांच्यासह चार आरोपींना कागदपत्रांसह आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्राच्या प्रती पुरवण्याचे निर्देश दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज सीबीआयला दिले. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी अमनदीप ढल, बुची बाबू, अर्जुन पांडे आणि मनीष सिसोदिया यांना या कागदपत्रांच्या प्रती पुरवण्याचे निर्देश दिले. सिसोदिया यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर करण्यात आले.
यासोबतच न्यायालयाने सिसोदिया यांचे वकील आणि त्यांच्या मित्राला न्यायालयीन कोठडीत भेटण्याची परवानगी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. न्यायालयाने २७ मे रोजी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य तिघांविरुद्ध दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली होती. याबरोबरच न्यायालयाने सिसोदिया आणि अन्य तीन आरोपींना समन्स बजावले होते.