नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. मात्र, जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला एखाद्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेटता येईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अर्जावर सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने ३ जूनला निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने सोमवारी हा निकाल सुनावला.
काही दिवसांपूर्वी न्यायालयाने सिसोदियांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत घरी जाण्यासाठी ८ तासांचा अंतरिम जामीन दिला होता. ते शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या घरी पोहोचले. परंतु त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सिसोदियांना त्यांना भेटता आले नव्हते. दरम्यान सिसोदियांना त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी पोलीस अधिकारी त्यांच्या घरी अथवा रुग्णालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घरी घेऊन जाऊ शकतात, असे आदेश न्यायालयाने दिला आहे.