मफतलाल मिलच्या जागेत साकारणार ‘नवी राणी बाग”

मुंबई – भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला मफतलाल मिलची १० एकर जागा मिळाली असून या जागेत आता नवीन राणी बाग साकारली जाणार आहे. याठिकाणी राणी बागेचा विस्तार करून मिनी राणी बाग तयार केली जाणार आहे. त्यासाठी झेब्रा,पांढरे सिंह, जिराफ, चिंपाझी आणि अनाकोंडासारखे देशी-विदेशी प्राणी आणले जाणार आहेत.या जागेत २ हजार ‘मियावाकी ” झाडांची लागवडही केली जाणार आहे.
मफतलाल मिलची ही १० एकर जागा या उद्यानाला लागूनच असून ती वर्षभरापूर्वीच पालिकेच्या ताब्यात मिळाली आहे. पालिकेने या जागेचे सीमांकन करून घेतले आहे. आतापर्यंत या जागेवर कोणतेही अतिक्रमण झालेले नाही. त्यामुळे ही जागा सहजपणे ताब्यात घेता आली आहे. आता या जागेवर तातडीने विस्तार करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या जागेत लावली जाणारी मियावाकी ही झाडे कमी जागेत आणि कमी वेळेत वाढतात. या झाडांमुळे राणी बागेतील हा एक ‘हरित प्रकल्प ” बनणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top