नांदेड – मराठा समाजाला कुणबी जातीमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्तील अंतरगाव सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला आहे. या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेवून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून, मराठवाड्यात ३३ लाख ३१ हजार कुणबी मराठा समाज असून, नांदेड जिल्ह्यात सुमारे ८७ हजारांची नोंद आहे.
मागील पाच वर्षाच्या कालावधीत मराठवाड्यात ६३२ पैकी ६११ कुणबी मराठा समाजाचे अर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये औरंगाबाद ३९५, नांदेड ९०, बीड ७३, धाराशिव ०७, जालना ४२, परभणी १२, लातूर २ या अर्जांचा समावेश आहे. मागील १५ दिवसात नांदेड जिल्ह्यात जवळपास २ लाख अभिलेख (१९७० नंतरची) तपासण्यात आले. त्यापैकी ८७ हजार कुणबी मराठा समाजाचे असल्याचे आढळून आले. अभिलेख तपासणीत जन्म मृत्यू, रजिस्टर नोंदणी, कोतवाल यांच्याकडील नोंदी, शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे.