मुंबई – मुंबईतील चर्चगेट, नरिमन पॉईंट येथील मरिन ड्राईव्ह समुद्रानजीक असलेल्या जुन्या जेटीच्या जागेवर आता सी साईड प्लाझा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या जेटीच्या जागेवर सुरक्षात्मक कठडे उभारुन आणि विद्युत रोषणाई करून गिरगाव आणि दादर चौपाटीवरील व्ह्यूविंग डेकप्रमाणे याला स्वरुप देण्यात येणार आहे. तसेच फिलिपाईन्सची राजधानी असलेल्या मनीलाच्या धर्तीवर वॉटर फ्रंट बनवले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसह पर्यटकांना समुद्राच्या ६० मीटर आतमध्ये जाऊन समुद्राच्या चित्र न्याहाळता येणार आहे. या उपक्रमासाठी पालिका ९५ लाख रुपये खर्च करणार आहे.
कुलाबा विधानसभेचे भाजप आमदार आणि विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी या योजनेबाबत नियोजन विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार नियोजन विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना करून करत याचे संकल्पचित्र बनवून त्यांची निविदा मागवली. निविदेत वित्राग इंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली.
नरीमन पॉईंट येथील समुद्रात जुनी जेटी असून या जेटीचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात नाही. त्यातच दहशतवादी हल्ल्यातील कसाब व त्याचे साथीदार हे बुधवार पार्कमधून समुद्र मार्गे आल्यानंतर ही जेटी पूर्णपणेच बंद होती. या जेटीच्या दोन्ही बाजुंनी समुद्राच्या लाटांची तीव्रता कमी करण्यासाठी ट्रेटा पॉड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे जेटीच्या जागेवरच सुरक्षा कठडे अर्थात रेलिंग लावून विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला. ही जेटी समुद्र किनाऱ्यापासून ६० ते ७० मीटर आत आहेत. त्यामुळे या जेटीच्या जागेवर सुरक्षा कठडे बसवून या जागेचे सौंदर्यीकरण करत मुंबईकरांना समुद्र परिसर अगदी चांगल्या प्रकारे न्याहाळता येईल असे याचे सुशोभिकरण करण्यात येईल.