लंडन- सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेत्या तसेच मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या पाकिस्तानी कार्यकर्त्या मलाला युसुफझाई यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिनक्रे कॉलेजने मानद फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. यासह मलाला हा सन्मान मिळवणारी पहिली पाकिस्तानी ठरली आहे. ऑक्सफर्ड पाकिस्तान प्रोग्राम ने ही घोषणा केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात मलालाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच नोबेल पारितोषिक विजेते सर पॉल नर्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या संसदेच्या नॅशनल असेंब्लीचे पहिले स्पीकर डॉ. फ्रॅन गिनवाला यांनाही कॉलेजतर्फे ही मानद फेलोशिप देण्यात आली आहे.
मलाला युसुफझाई यांना परस्कर मिळाल्यानंतर ‘माझ्या मुलीला हा सन्मान मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज जेंव्हा तीला हा सन्मान मिळत होता तेंव्हा मलालाच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसत होता, असे मालाला यांचे वडील झियाउद्दीन युसुफझाई यांनी म्हटले आहे. तसेच मलाला या संधीचा उपयोग तिचे काम पुढे नेण्यासाठी करेल. यामुळे मुलींना शिक्षणादरम्यान मुलींना येणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधण्यातही मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना मलालाने लिनक्रे कॉलेजमध्ये तिच्या काही आठवणी सांगितल्या. मलालाने ऑक्सफर्ड पाकिस्तान कार्यक्रमाचे कौतुक केले आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांचे जीवन बदलत असल्याचा विश्वासही व्यक्त केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निक ब्राउन यांनी मलालाच्या स्त्री शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आज मलालाची संपूर्ण जगात स्त्री शिक्षणासाठी काम करण्याची वेगळी ओळख असल्याचे सांगितले.
मलाला युसुफझाई ऑक्सफर्डकडून ‘ऑनररी फेलोशिप’ द्वारे सन्मानित
