मल्याळम अभिनेते मोहनलाल कोचीच्या रुग्णालयात दाखल

कोची- मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने आज त्यांना कोचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप, श्वास घेण्यास त्रास आणि स्नायुदुखी अशी लक्षणे आहेत. रुग्णालयाने अधिकृत वैद्यकीय निवेदनात सांगितले की, मोहनलाल यांना श्वसनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘बरोज’चे पोस्ट-प्रॉडक्शन पूर्ण केल्यानंतर मोहनलाल गुजरातमधून कोचीला परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाचे अधिकृत निवेदन मनोरंजन उद्योगातील ट्रॅकर आणि लेखक श्रीधर पिल्लई यांनी एक्सवर शेअर केले आहे. या निवेदनात मोहनलाल यांना श्वसनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले.