मुंबई – मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील परिचारिकांनी आज पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयासमोर 5 दिवस कामकाज आठवडा यासाठी आंदोलन केले. सर्व पालिका रूग्णालयातील परिचारिकांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरत या आंदोलनात मोठा सहभाग दर्शवला. 5 दिवसांचा आठवडा आणि दर आठवड्याला 2 सुट्ट्या लागू करण्याच्या मागणीसाठी परिचारिकांनी आवाज उठवला होता. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या ठाकरे गटाच्या युनियनतर्फे हे आंदोलन पुकारले होते. राज्य तसेच केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना 5 दिवसांचा आठवडा आहे, पण पालिकेतील परिचारिकांना मात्र शनिवारीही काम करावे लागते. पालिकेच्या सर्वच रुग्णालयात रुग्णसंख्या जास्त आहे. रुग्ण जास्त आणि परिचारिका कमी अशी स्थिती असल्याने परिचारिकांना जास्त काम करावे लागते आहे. जोपर्यंत मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत पालिकेच्या एफ दक्षिण विभागासमोरून हलणार नसल्याचा पवित्रा ह्या परिचारिकांनी घेतला. दरम्यान, मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांनी मंगळवारी 8 मे रोजी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ’अभी नही तो, कभी नहीं’ असे म्हणत सामुदायिक रजा आंदोलनाची पूर्वतयारी बैठक घेतली. सदर बैठकीस सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, सुभाष पवार, चिटणीस वृषाली परुळेकर, हेमंत कदम, अजय राऊत, सल्लागार हरिदास जामठे यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्ष बाबा कदम यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना परिचारिकांच्या कायम पाठीशी राहील, असे आश्वासित केले.
महापालिका रुग्णालय परिचारिकांचे 5 दिवस कामकाजासाठी आंदोलन
