महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही राज ठाकरे यांची सडेतोड भूमिका

सोलापूर – महाराष्ट्रात सर्व काही मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याची काहीही गरज नाही, अशी सडेतोड भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना मांडली.
आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी
संवाद साधला.
महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचे राज्य आहे. येथे सर्व सोयीसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोणताही समाज या सोयी-सुविधांपासून वंचित राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याची मुळीच गरज नाही. देशाला दिशा देणार्‍या पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू आहे, हे दुर्दैवी आहे, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होत आहे, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते. राज्यातील नोकर्‍यांमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना शंभर टक्के प्राधान्य देण्याच्या भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. केंद्र सरकारी कार्यालयांमधील महाराष्ट्रातील रिक्त जागांच्या जाहिराती बाहेरच्या राज्यांमध्ये प्रसिध्द केल्या जातात. त्यामुळे या नोकर्‍या बाहेरच्या राज्यातील तरुणांना मिळतात. हे बंद झाले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करीत म्हटले की, लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला पाठिंबा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी होता. विधानसभेला पाठिंबा देण्याबाबत आपण काहीही शब्द दिला नव्हता. विधानसभेच्या 225 ते 250 जागा मनसे स्वबळावर लढविणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाने सातत्याने सरकारला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत धारावी अदानींच्या घशात घालू देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत वारंवार मांडत आहेत. याबाबत छेडले असता, मुंबईत धारावी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा चौरस फुटाचा भाव जर तुम्ही काढलात तर तुम्हाला या मुद्यावरून सुरू असलेले राजकारण सहज कळेल, असे सूचक विधान राज ठाकरे यांनी केले. संध्याकाळी राज ठाकरे धाराशीवमध्ये हॉटेलमध्ये थांबले असताना काही मराठा आंदोलक तिथे आले. त्यांनी राज ठाकरेंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी
त्यांना अडवले.

दोन उमेदवार जाहीर
राज ठाकरे सोलापूर दौर्‍यावर असतानाच आज मनसेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली.
बाळा नांदगावकर यांना शिवडी मतदारसंघातून, तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यांना आरक्षणातील
काही कळत नाही
जरांगेंची टीका

राज ठाकरेंच्या आरक्षण-विषयक वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील म्हणाले की, ज्यांना आरक्षणातील काही कळत नाही, त्यांच्यावर काय बोलावे? राज ठाकरेंना त्यांचे मित्र भडकवत आहेत. त्यांनी मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही. मराठे फक्त हक्क मागत आहे. तुमच्या मित्राला तुम्ही रोज भेटता. पण सागर बंगल्यावर जाऊन तुमचे डोके भडकत आहे.