मुंबई – बारसू प्रकल्प, राज्यातल्या सध्याच्या अनेक राजकीय घडामोडी पाहता 1मे ची म्हणजे सोमवारची मुंबई, बांद्रा-कुर्ला संकुलातील वज्रमूठ सभा गाजणार यात शंका नाही. युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी ही सभा यशस्वी करायची धुरा उचलली आहे. राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट जनतेपर्यंत आपली भूमिका मांडण्यासाठी वज्रमूठ सभेच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहे.
यापूर्वी ‘वज्रमूठ’ सभेतील मालिकेतल्या दोन सभा संपन्न झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरनंतर तिसरी जाहीर सभा महाराष्ट्रदिनी म्हणजेच 1 मे रोजी संध्याकाळी होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही सभा असल्याने ठाकरे गटाने ही सभा यशस्वी करण्याकरिता जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, असा ठाकरे गटाचा प्रस्ताव होता. मात्र शरद पवार हे राज्यपातळीवरील मेळाव्यांना उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन-दोन नेते भाषण करतात. पण या सभेत केवळ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलणार असल्याचे कळते. आदित्य ठाकरे यांनी बोलावे असा प्रस्ताव आहे, मात्र एकाच सभेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बोलू नये, असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेच बोलतील असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड हे दोन नेते भाषण करणार असल्याचे सांगितले जात आहे. पण अजित पवार बोलणार की नाही ते उघड केलेले नाही. काँग्रेस पक्षाकडून कोणते दोन नेते भाषण करणार आहेत यावर अजून काही निर्णय झालेला नाही. मुंबईचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाषण करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या सभेचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये मागील वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणाची झलक पाहायला मिळते. मागील एका सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, देश कसा चालला पाहिजे, लोकशाही कशी टिकली पाहिजे यासाठी एक माणूस देशासाठी संविधान लिहू शकतो. तर इतकी मोठी वज्रमूठ, कोट्यवधी, अब्जावधी लोक त्या राज्यघटनेचे रक्षण करू शकत नाही का?
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत! गर्दीचा उच्चांक मोडणार?
