भंडारा- भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे माजी भाजपा आमदार रामचंद्र अवसरे यांचे शनिवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. भंडारा येथील लक्ष रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी दुपारी ३ वाजता पवनी येथील वैजेश्वर मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ असा परिवार आहे.
रामचंद्र अवसरे यांना शुक्रवारी भाजपाच्या बैठकीत अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे शनिवारी त्यांना भंडाऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण सायंकाळच्या दरम्यान त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले.यावेळी डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. दरम्यान, अवसरे २०१४ ते २०१९ या काळात भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. ते २००९ पर्यंत शिवसेनेत होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि २०१४ निवडणूक जिंकले.
माजी भाजपा आमदार रामचंद्र अवसरे यांचे निधन
