माथेरान – माथेरान घाटरस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील मालडुंगा पॉइंटवर दरड कोसळल्याने रस्त्याचा काही भाग खचला. पावसाचा जोर वाढल्याने डोंगरावरून लाल मातीसह येणारे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत असल्याने धोदाणी गावचे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान, हा पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात केले आहेत.
माथेरानमध्ये पर्यटकांना पाहण्याकरिता एकूण ३८ पॉईंट्स आहेत. सनसेट पॉईंट आणि मंकी पॉईंटच्या मधोमध मालडुंगा पॉईंट आहे. या पॉईंटच्या बाजूला असलेल्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या कंपाऊंडला ८ ते १० फुटांचे चरे पडले आहेत. २०० मीटर भाग पूर्णपणे खचला आहे. माथेरान कड्यालगतच्या गावकऱ्यांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे अभियंता अभिमन्यू येळवंडे, लेखापाल तथा पालिका अधीक्षक अंकुश इचके, पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार शेख, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत आदींनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. हा पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात केले आहेत.
माथेरानच्या मालडुंगा पॉईंटवर दरड कोसळली! रस्ता खचला
