सनियंत्रण समितीवर स्थानिक नागरिक नाराज माथेरान – तब्बल 172 वर्षांपासून सुरू असलेल्या अमानवीय प्रथेतील हातरिक्षाच्या जोखडातून माथेरानमधील तरुणांची नुकतीच कुठे सुटका झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर माथेरानमध्ये ई- रिक्षा सुरू झाली होती. मात्र तिची मुदत संपल्याने ती पून्हा बंद करण्यात आली आहे. या ई – रिक्षाचे भवितव्य आता न्यायालयानेच नेमलेल्या सनियंत्रण समितीच्या हातात गेले आहे. ही समिती मुंबईत बसून माथेरानच्या पर्यावरणाचे स्वप्न रंगवीत असून त्यासाठी गांभिर्याने विचार करत नसल्याने या ई-रिक्षा सध्या पालिकेच्या आवारात गंजत उभ्या आहेत. माथेरानकरांच्या मागणीनुसार ही ई-रिक्षा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे ती पून्हा सुरू करण्यासाठी अनेकदा आंदोलने उभारली.तरीही मूग गिळून गप्प बसलेल्या सनियंत्रण समितीने त्याबाबत काहीही ठोस निर्णय घेतलेला नाही. वास्तविक मुंबईत राहणार्या या समितीतील सदस्यांना माथेरानकरांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.ई -रिक्षा बंद असल्याने शालेय विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ति,ज्येष्ठ नागरिक यांचे होणारे हाल या समितीला दिसत नाहीत.इथल्या नागरिकांच्या भल्यासाठी काय करता येईल यासाठी ही समिती काहीच प्रयत्न करत नसल्याचा आरोप इथले माथेरानकर करत आहेत. विशेष म्हणजे या समितीत स्थानिक नगराध्यक्ष,आमदार आणि नगरसेवक यांना समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे या समितीला स्थानिक लोकांचे हित कशात आहे हे समजत नाही.ते आपल्या मनाला वाट्टेल तसेच निर्णय घेत असतात.यातून माथेरानकरांचा विकास होत नसल्याने माथेरानकर या समितीवर नाराज आहेत. दरम्यान, नगरपरिषद आवारात उभ्या असलेल्या या सात ई-रिक्षा पुन्हा एक वर्षासाठी काही ठेकेदारांना चालविण्यास देण्याचा नगरपरिषदेचा विचार असल्याचे समजते. तरी या ई-रिक्षा हातरिक्षा संघटनेला चालविण्यास द्याव्यात,तसेच सर्वोच्च न्यायालयाने ही माथेरानकरांच्या हिताची नसलेली समिती बरखास्त करावी अशी मागणी पुढे आली आहे.या समितीत सध्या सचिव म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत आहेत.