माद्रिद – स्पेनची राजधानी माद्रिद शहरातील रेस्टॉरंटमध्ये फ्लॅम्बी पिझ्झा सर्व्ह करताना आग लागल्याने एकच गोंधळ उडाला, या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले. ही घटना घडली तेव्हा रेस्टॉरंटमध्ये 30 लोक होते. आग लागताच या लोकांची एकच धावपळ उडाली.
रेस्टॉरंटमध्ये वेटरने पिझ्झा आणला, त्यावर अल्कोहोल ओतले आणि नंतर ब्लोटॉर्चने आग लावली. अशा प्रकारे फ्लॅम्बी पिझ्झा सर्व्ह केला जातो. मात्र, आग शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या फुलांपर्यंत पोहोचली आणि आगीने रौद्ररुप धारण केले. माद्रिदच्या महापौरांनी सांगितले की, आगीत रेस्टॉरंटमधील एक कर्मचारी आणि एका ग्राहकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 12 जखमींपैकी 6 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.