मुंबई – मुंबईच्या मानखुर्द येथे ३० एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन हल्लेखोरांना पकडण्यात मानखुर्द पोलिसांना यश आले आहे. सोनू सिंह (४२) आणि अतिष सिंह (२२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत, आरोपींना शोधण्यासाठी १४ पथके तयार केली होती. या पथकांनी तपास करत रविवारी रत्नागिरी येथून या दोघांना ताब्यात घेतले.
मानखुर्द येथे शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले. यातील एका महिलेच्या पती व मुलाने दुसऱ्या महिलेवर गोळीबार केला. यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या व्हिडिओमध्ये गोळीबार झाल्याची संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत होते. हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. या आरोपींना शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.