मानवी मेंदूमध्ये चिप बसवणार ‘न्यूरालिंक’ला चाचणीची मंजुरी

वॉशिंग्टन :
मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इलॉन मस्कच्या ब्रेन चिप कंपनी न्यूरालिंकला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी मानवी मेंदूवर चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे.

आतापर्यंत न्यूरालिंकने केवळ प्राण्यांवर याची चाचणी घेतली होती. माकड आणि डुकरांवरील या चाचण्यांचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत. मात्र आता मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाल्यामुळे भविष्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे न्यूरालिंक ने ट्विटद्वारे म्हटले आहे. मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप बसवून, त्यामार्फत ठराविक अपंगत्व आणि अनुवांशिक आजार बरे करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन हे तंत्रज्ञान येणाऱ्या काळात लोकांसाठी उपयुक्त ठरेल, असे देखील या संदर्भात न्यूरालिंकने म्हटले आहे. इलॉन मस्क यांनी या प्रयोगाच्या प्रात्यक्षिकादरम्यान दावा केला होता की, मेंदूमध्ये चीप बसवल्यानंतर अर्धांगवायू झालेला माणूसही संगणक चालवू शकेल.त्यामुळे इलॉन मस्क यांची योजना पूर्णपणे यशस्वी झाल्यास वैद्यकीय क्षेत्रासाठी ती वरदान ठरेल. श्रवण, बोलणे, लठ्ठपणा, ऑटिझम, नैराश्य, स्किझोफ्रेनिया इत्यादींनी ग्रस्त असलेल्या लोकांना याचा फायदा होणार असल्याचा दावाही इलॉन मस्क यांनी केला आहे.

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागाने यापूर्वी न्यूरालिंकच्या मानवी चाचणीला परवानगी नाकारली होती. यामध्ये मेंदूमध्ये प्रत्यारोपित केलेल्या उपकरणामध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम बॅटरीचा समावेश आहे. तसेच, मेंदूच्या ऊतींना इजा न करता उपकरण काढून टाकणे यासारखी आव्हाने आहेत. मात्र आता, एफडीएने मस्कला मानवी मेंदूवर चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. सरकारची परवानगी मिळाली असली, तरीही मानवी चाचणीला लवकर सुरूवात करण्यात येणार नसल्याचे संकेत इलॉन मस्कने दिले आहेत. मानवी चाचणीसाठी भरती सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच अधिक माहिती जाहीर करण्यात येईल असे, न्यूरालिंकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top