पणजी : मापा -पंचवाडी येथे मुख्य रस्त्यावर कारची झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोघे ठार तर पाचजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत पावलेले मावस भाऊ-बहीण आहेत. सिद्धम महादेव नाईक व रेशम राजेंद्र नाईक अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडला.
या अपघातात कारच्या पुढच्या सीटवर महादेव नाईक यांचा मुलगा सिद्धम नाईक होता तर मागच्या सीटवर बसलेली रेशम नाईक हे दोघे गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर जखमींमध्ये कारचालक महादेव नाईक, पूर्वा महादेव नाईक सौम्या महादेव नाईक, राधिका राजेंद्र नाईक व रोहिणी नाईक यांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी पाज-शिरोडा व रिवण येथील दोन्ही कुटुंबीय शिर्डी येथे साईदर्शनाला गेले होते. काल रात्रीच ते शिरोडा येथे घरी परतले होते.रात्री उशीर झाल्यामुळे सकाळी रिवण येथे मेहुणी व तिच्या मुलांना पोचवण्यासाठी तसेच एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी कारचालक महादेव नाईक हे कारने पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासमवेत निघाले होते.