मुंबई – सर्वात मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने जगभरातील व्यवहार ठप्प होऊन खळबळ उडाली. संगणकांतील विंडो सिस्टमवर निळ्या रंगाची स्क्रीन झळकून इंटरनेट वापरणार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे जगभरातील बँका, शेअरबाजार विमानतळे, रेल्वे, पेमेंट सिस्टम, आपत्कालीन सेवा, आरोग्य यंत्रणा आणि ब्रॉडकास्टिंग सेवांना फटका बसला. भारतासह ब्रिटन, तुर्की, जर्मनी, स्पेन यांसारख्या अनेक देशांमध्ये सर्व्हरच्या समस्येमुळे व्यवहार खोळंबले. विमान कंपन्यांवर याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला. हजारो उड्डाणे रद्द झाली, तर अनेक उड्डाणांना उशीर झाला. आतापर्यंतचे सगळ्यात मोठे आयटी संकट असे समजल्या गेलेल्या या बिघाडाने संगणकांनी काम करायचे थांबवले तर सगळे जगच कसे थांबू शकते, याचीच प्रचिती दिली.
भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण साडेबारा वाजता मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या अझुर बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली. ज्यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर
रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रिस्टार्ट करण्याची गरज आहे, असा संदेश सगणकांच्या स्क्रीनवर झळकून अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागली.
या बिघाडामुळे जगभरातील एकेक सेवा कोलमडू लागल्या. अमेरिकेतील आपत्कालीन 991 ही इमर्जन्सी सेवा बंद झाली. ऑस्ट्रेलियातील पेमेंट सेवाही ढासळली. अमेरिकेत विमान कंपन्यांना व्यवहार करणे अवघड होऊ लागले. तुर्कीश एअरलाईन्स या कंपन्यांच्या सेवा खंडित झाल्या आहेत. जगभरात एकूण 1,400 विमाने रद्द झाली, तर 3,000 विमाने उशिरा उडाली. भारतात अकासा, इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, स्पाईसजेटची विमानसेवा प्रभावित झाली. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुच्या विमानतळांवर उड्डाणे ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने झाली. काही विमान कंपन्यांनी प्रवाशांना हाताने लिहिलेले बोर्डिंग पास दिले. या गोंधळामुळे विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याची विनंती केली. केवळ एअरलाईन्सच नाही, तर बँकिंग सेवा, तिकीट बुकिंग आणि स्टॉक एक्स्चेंजवरही अनेक देशांमध्ये परिणाम झाला. ऑस्ट्रेलियातील बँक कॉमनवेल्थ या सगळ्यात मोठ्या बँकेची सेवा खंडीत झाली. तर न्युझीलंडमधील काही बँकांचे व्यवहार बंद पडले. ब्रिटनमध्ये रेल्वे आणि टीव्ही चॅनलवर परिणाम झाला. सरकारने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद केली. तर स्काय न्यूज टीव्हीचे लाईव्ह प्रसारण बंद झाले. जीमेल, अॅमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही या बिघाडाचा परिणाम झाला. पैशाचे व्यवहार आणि व्यवसायाशी संबंधित अनेक बाबींमध्ये अडचणी निर्माण झाल्या. शेअर बाजारावरही परिणाम झाला. अनेकांना शेअर्स खरेदी-विक्री करता आली नाही. अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सवर शेअरची खरेदी-विक्री करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. भारतातील ब्रोकरेज फर्म ‘5 पैसा’, ‘आयआयएफएल सिक्योरिटीज’च्या सिस्टमवर प्रभाव पडला. भारताप्रमाणे लंडनमध्ये शेअर मार्केट बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सतत संपर्कात होते. तसेच या परिस्थितीत काय काळजी घ्यायची याची सूचनावलीही भारत सरकारने जारी केली.
सुरुवातीला हा सायबर हल्ला आहे, अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु संध्याकाळी ज्या सॉफ्टवेअरमुळे हा बिघाड झाला, त्याचे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनी असा खुलासा केला की, क्राउडस्ट्राइक सॉफ्टवेअरच्या अपडेटमुळे हा बिघाड झाला आहे. कंपनीने विंडोज सिस्टम्समध्ये जागतिक बिघाड होण्याचे कारण शोधले आहे आणि त्याचे निराकरण केले आहे. हा सायबर हल्ला नाही किंवा सुरक्षेतील त्रुटीही नाही. मायक्रोसॉफ्टने काही सेवा हळू हळू पूर्ववत होत असल्याचे सांगितले. मात्र अनेक तास तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला नव्हता. त्यामुळे अनेक सेवा पूर्वपदावर
आल्या नव्हत्या.
