नवी दिल्ली – मार्च महिना सुरु होत असून यंदाचा उन्हाळा भाजून काढणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. हवामान खात्याने याबाबतचा हंगामी अंदाज मंगळवारी प्रसिद्ध केला. यात मार्च ते मे महिन्या दरम्यानच्या हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला. ‘वायव्य, मध्य व ईशान्य भारतात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. वायव्य व मध्य भारतात मार्चपासूनच उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रात्रीही उष्णता जास्त जाणवणार आहे,’ असे हवामान खात्याच्या जल व अॅग्रोमेट विभागाचे प्रमुख एस. सी. भान यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हीट व्हेवच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली आहे. या मार्गदर्शन नियमावलीनुसार नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्म्याचा त्रास जाणवत असल्यास ओआरएस जवळ ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.