मुंबई : राज्यात एकिकडे कोव्हिडच्या रुग्णांमध्ये नव्याने वाढ असताना, एच-३ एन-२ फ्लूच्या रुग्णांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे यावर उपचार नसल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नागरिकांना केले आहे.
सर्दी, खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत इन्फ्लूएंझाच्या ३६१ रुग्णांची नोंद झाली असून, त्यात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर येथे एच-३ एन-२ इन्फ्लूएंन्झा रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. तसेच यावर उपचार नसल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. नागरिकांनी कारणाशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखाण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एच-३ एन-२ सह कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.