नवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही माहिती दिली. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटमधून अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी १९७६ साली आलेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतरही ‘तहादेर कथा’ आणि ‘स्वामी विवेकानंद’ या चित्रपटांसाठीही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत सुरक्षा, वारदात, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, हम पाँच, वारदात, अग्निपथ, प्यार का मंदिर यासारख्या साडेतीनशे चित्रपटात भूमिका केल्या असून त्यांची नृत्याची विशिष्ट शैलीही लोकप्रिय झाली होती.