मीरारोड – मीरा रोडमधील हत्याकांडातील बळी सरस्वती वैद्य हिच्या तीन सख्ख्या बहिणींनी आज पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी तिची ओळख पटवली आणि मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यांची डीएनए चाचणी सरस्वतीच्या डीएनएशी जुळतो का ते पाहिल्यानंतर पोलीस पुढील प्रक्रिया पार पाडणार आहेत. दरम्यान आरोपी मनोज साने आपला जबाब सतत बदलत आहे. आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सरस्वती मला मुलीसारखी होती, असेही तो म्हणाला.
सरस्वती मनोजसोबत राहत असल्याची कल्पना तिच्या बहिणींना होती. त्या दोघांच्या वयात अंतर असल्याने त्याला ती मामा मानते असे तिने नातेवाईकांना सांगितले होते, अशी माहिती बहिणींनी दिल्याचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. दरम्यान, मनोजने पोलीस चौकशीत म्हटले, ‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. मी सरस्वतीशी कधी शारीरिक संबंध ठेवले नाही. सरस्वती ही माझ्या मुलीसारखी होती. तिने ३ जून रोजी आत्महत्या केली होती. माझ्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने मी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:चे आयुष्यही संपवण्याचा प्लान केला होता.’ सरस्वती आणि मनोज यांनी रजिस्टर्ड लग्न केले नसले तरी मंदिरात लग्न केले होते. मात्र लग्नाची तारीख मनोजला आठवत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.