मी ठाण्यातून जिंकून दाखवणार
जनप्रक्षोभ मोर्चात आदित्यचा निर्धार

ठाणे – ठाकरे गटाची कार्यकर्ती रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज ठाण्यात या घटनेचा निषेध करण्यासाठी जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतरच्या सभेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी ठाण्यातून लढेन आणि जिंकून दाखवेन असे जाहीर आव्हान दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभाग घेतला. पोलिसांनी मोर्चाला 15 अटींसह परवानगी दिली होती.
खासदार राजन विचारे, आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण, काँग्रेस नेत्या विद्या चव्हाण, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, ठाकरे गटाचे केदार दिघे यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. दुपारी 4 च्या सुमारास ठाण्यातील शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाण्यातील मविआच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मविआच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते.
मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘एक गद्दार सुप्रिया सुळे यांना जाहीर शिव्या देतो, त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले जाते. दुसरा एक गद्दार सुषमा अंधारे यांना शिव्या देतो, त्याला मांडीला मांडी लावून बसवले जाते. पण रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, तर पोलिसांनी मारहाण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला हे दुर्दैवी आहे.
ते पुढे म्हणाले, ”महिलेवर हल्ला झाला आणि तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात येतो, आणि ठाण्याच्या माजी महापौर या घटनेचे समर्थन करतात हे अयोग्य आहे. सुसंक्कृत ठाणे यामुळे एकदम बदनाम झालेच आणि या गद्दारांमुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब होत आहे. महाराष्ट्रात एवढे गलिच्छ राजकारण कधी पाहिले नाही.
’महिला जर गरोदर नसेल तर तिच्या पोटात लाथ मारणे योग्य आहे का, असा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. ’दादागिरीकरुन पक्ष वाढत नसतो; लोकांना जीव लावावा लागतो, रोशनींच्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह काही नाही,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Scroll to Top