मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले काही सुरू असलेल्या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोपरखळ्या मारल्या आहेत. दमानिया यांनी गेल्या दोन दिवसांत तीन ट्विट करून या घडामोडींवर खोचक भाष्य करत आहेत.
गुरुवारी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये दमानिया यांनी मी तुझा काका, देईन तुला धक्का, अशी कमेंट केलीय. मागील काही दिवसांपासून अजित पवार लवकरच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एका प्रकारे अजित पवारांना धक्का दिला आहे. अशी चर्चा रंगली आहे. या चर्चेला दमानियांच्या ट्विटमुळे खतपाणी मिळत आहे.
शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळून पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे, अशी विनंती करणार असल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावरदेखील दमानिया यांनी ट्विटमधून भाष्य करत, “अजित पवार हे माध्यमांशी काहीच न बोलता निघून गेले. याचाच अर्थ हा की त्यांच्या मनासारखे झाले नाही. जितेंद्र आव्हाड यांना कार्यकर्त्यांनी पेढे भरवले? अजित पवारांना नाही? असा प्रश्न विचारला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी केलेल्या तिसर्या ट्विटमध्ये, इतक्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत, अजित पवार गैरहजर? असे विचारून अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दमानिया यांनीच काही दिवसांपूर्वी अजित पवारभाजपमध्ये जाणार असे ट्विट केले होते. त्यानंतर अजित दादांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.