मुंबई – महाविकास आघाडीच्या प्रचंड गर्दीतील वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची भाषणे झाली. अजित पवार बोलणार की नाही याबद्दलच सर्वाधिक उत्कंठा होती. अजित पवारांनी भाषण केल्याने अनेकांनी सुस्कारा सोडला. अजित पवारांनी यावेळी आवाहन केले की, हे घोटाळा करून मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी आव्हान देत म्हटले की, मी 6 मे रोजी बारसूला जाणारच, मला कोण अडवते, ते बघूया.
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाने रक्त सांडून, बलिदान करून आपली हक्काची राजधानी मिळवली. त्यांनी तेव्हा लढा दिला नसता, तर आज तुम्ही गद्दारी करून का होईना, मुख्यमंत्री झाला नसता. मुंबई आपल्याला कशी मिळाली हे आपण विसरलो तर आज मुंबईचे लचके तोडायला हे मागेपुढे पाहणार नाहीत. निवडणुकांमध्ये आपण वज्रमूठ वळवून विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे. मी येत्या 6 तारखेला बारसूमध्ये जाऊन बारसूतल्या लोकांना भेटून बोलणार आहे. बारसूत माझ्या नावाने पत्र दाखवत आहेत. मी जागा सुचवली होती. पण तिथे पोलिसांना घुसवा, लाठी चालवा, पण रिफायनरी करा असे मी पत्रात लिहिलेले नाही. मुंबईतली बीकेसीची सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनच्या घशात घातली. मुंबईतून किती लोक अहमदाबादला जाणार आहेत? कोणासाठी करत आहात बुलेट ट्रेन? मेट्रोसाठी केंद्र सरकार कोर्टात गेले. मेट्रोच्या कारशेडला माझा विरोध नव्हता, माझा जागेला विरोध होता. शेवटी कांजूरमार्गलाही कारशेड केले.
मग आक्षेप का घेतला होता? दोन्हीकडे कारशेड करून मुंबईच्या पर्यावरणाचे नुकसान केले. मुंबईतले सर्व महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला नेले आणि मुंबईला बकाल केले. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारून टाकायची हे यांच्या भांडवलदारी वृत्तीचे मनसुबे आहेत. मुंबईत महापालिकेच्या ठेवींवरही यांचा डोळा आहे. मुंबईची लूट सुरू आहे. मराठी भाषा सक्तीची केली होती, तो निर्णयही या
सरकारने फिरवला.’ पालघरमध्ये आदिवासींवर केलेले अत्याचार, बारसूत केलेली मारहाण, खारघरला स्वार्थासाठी तुम्ही बळी घेतले या सर्वांचे शाप तुम्हाला भोवतील, असेही उद्धव ठाकरे उद्वेगाने म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीची ही तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत होत आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ती सहजासहजी मिळालेली नाही. अनेक लोकांचे त्यामागे बलिदान आहे. मुंबईचा मानसन्मान वाढवण्याचे मोलाचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केले. शिवसेनेमुळे मराठी माणूस टिकून राहिला हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच लोकांच्या मनात सलू लागले. हे सरकार आल्यापासून कोणत्याही निवडणुका, पोटनिवडणुका, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले आहे. कारण जनता आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडी सरकारपुढे अनेक समस्या होत्या, पण तरीही सरकारने चांगले काम केले. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. उन्हाळी पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, पण त्याची फिकीर या सरकारला नाही. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. सरकार निवडणुका घ्यायला का घाबरत आहे? भिती कशाची वाटत आहे? जनता पाठीशी राहील की नाही याचा विश्वास शिंदे-फडणवीस सरकारला नाही. लोकांना निवडून देण्याची संधी का देत नाही?
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटले, याचीही सरकारला लाज नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण नैतिकदृष्ट्या सरकारला काहीच वाटत नाही.
घोटाळा करून जे मुख्यमंत्री झालेत, ते भाषणातही घोटाळे करतात. येत्या काळात महाविकास आघाडीची एकी टिकवण्याकरिता थोडे मागे-पुढे व्हावे लागले तरी कार्यकर्त्यांनी तशी मानसिकता ठेवायला हवी. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सांगितले की बदल्यांचे दर ठरले आहेत. महाराष्ट्रात कधीही न घडलेला असा भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. सर्व प्रमुख महानगरपालिकांचे काम मंत्रालयातून चालतात, हे महानगरपालिकांना परवडणारे नाही. प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मविआ सरकार पाडण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी दीडशे बैठका घेतल्या असे तानाजी सावंतांनीच सांगितले. आम्ही सत्तेवर असताना आर्थिक घडी बसवली होती. पण आता मुंबई पालिकेतील कंत्राटदाराची 1 लाख 18 कोटीची बिले रखडली आहेत अशी स्थिती करून ठेवली आहे.’ बीकेसी मैदानात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
मन की बात नको
काम की बात करा
वज्रमूठ सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले, ‘असा एकच पंतप्रधान या देशाने पाहिला असेल, जो 9 वर्षे फक्त ‘मन की बात’ करतोय. मन की बात नको, आता ‘काम की बात’ करा.’
‘मी साहेबांसोबत’
राष्ट्रवादीच्या टोप्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सभास्थळी पांढर्या टोप्या घालून आले होते. ‘मी साहेबांसोबत’ असे वाक्य टोपीवर लिहिले होते. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांच्या टोप्यांनी लक्ष वेधून घेतले होते.