जळगाव – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवले. मात्र या सगळ्या सत्तातरांच्या काळात मी तर ३२ नंबरला गेलो. माझ्या आधी ३१ जण गेले होते. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यात पाच आमदार गेले होते. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. असे म्हणत शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सत्तातरांच्या वेळचा घटनाक्रम अधोरेखित केला.
केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील साळवे गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या निमित्ताने रविवारी मंत्री गुलाबराव पाटील भूमिपूजनासाठी उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदेसोबत अनेकजण जात होते. सुरवातीला नागपूरचाही पळून गेला, बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले, नाशिकचे गेले, दादर, ठाण्याचे सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केले असते? सर्वच शिंदेंसोबत पळून गले. चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग मी देखील निर्णय घेत एकनाथ शिंदेंसोबत गेलो. मग माझ्यावरती झाडी, डोंगर, खोके अशा टीका होत गेल्या. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणाकरता शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तेवत ठेवून भाजपसोबत पुन्हा युती केली. मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे. तो महाराष्ट्राचा झाला नसता. त्यामुळे मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो.’ दरम्यान, गुलाबरावांनी खासदार संजय राऊतांना टोला लगावला. ते म्हणाले, ‘संजय राऊतांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? ते कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश आहेत? झोपेतून उठतात आणि बोलतात, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना है. याची ठाण्यामध्ये डोक्याची टेस्ट केली पाहिजे. ‘