मुंबईतील सफाई कामगारांची पदोन्नती बंद करण्याचा प्रयत्न

मुंबई – मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांना पदोन्नती देण्याबाबतच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार सफाई कामगारांना लिपिक पदाच्या पदोन्नतीसाठी दहावीऐवजी पदवीधर असण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या निकषाला हरताळ फासून पदोन्नती बंद करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचे बोलले जात आहे.

पालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांना लिपिक पदासाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. एखादा कामगार १०वी उत्तीर्ण असेल तर त्याला खात्यांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण होऊन लिपिक पदावर पदोन्नती दिली जात होती. स्थायी समिती आणि पालिका सभागृहाने ४२ वर्षांपूर्वी तसा निर्णय घेतला होता. मात्र, पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्यांना या खात्यांतर्गत परीक्षेतून बाद केले आणि फक्त पदवीधर असलेल्यांनाच परीक्षा देता येईल, असा निर्णय घेतला.

मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने याला औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. पालिका प्रशासनानेही त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलेली नसतानाही पालिकेने फक्त पदवीधरांनाच परीक्षेस बसण्याचा निर्णय घेतला आहे.हा न्यायालयाचा अवमान असल्याचे मत मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड.प्रकाश देवदास यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top