मुंबई :
मध्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून मध्य मार्गावरील डाऊन व अप तसेच स्लो व फास्ट ट्रकवरील वाहतूक दुपारपर्यंत बंद राहील. शिवाय १२१२६ पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील.
दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल. कुर्ला – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करू शकतील.