- ३६५ मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित केले
मुंबई – नियमबाह्य़ पद्धतीने चालणार्या मेडिकल दुकानांपैकी ७८ मेडिकल दुकानांचा परवाना प्रशासनाने रद्द केला असून ३६५ मेडिकलचे परवाने निलंबित केले आहेत,अशी माहिती एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिली.
नियमानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना औषध देणे, दुकानात फार्मासिस्ट नसणे, खरेदी- विक्रीच्या योग्य नोंदणी नसणे, आवश्यक औषधे फ्रीजमध्ये न ठेवणे अशा अनेक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होते. मुंबई शहरात ७ हजार ७५८ किरकोळ मेडिकल दुकाने असून ५ हजार ५५८ होलसेलर मेडिकल दुकाने आहेत.वर्षभरात एफडीएने १ हजार १९५ मेडिकलची तपासणी केली आहे. मेडिकल दुकानांची वर्षभरात अन्न,औषध प्रशासन विभागाने तपासणी केली. औषधी दुकान चालवताना नियम ६५ नुसार दुकानदाराने कोणती काळजी घेतली पाहिजे, हे नमूद केले आहे. त्या नियमातील अटी, शर्तीचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते, अशी माहिती अन्न, औषध प्रशासनच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान, मुंबई बाहेरील ठाणे, रायगड जिल्ह्यातील शहरी भागात बनावट प्रमाणपत्र मिळवून मेडिकल दुकाने चालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यातील अनेकांनी राजस्थानमधील एका महाविद्यालयात परिक्षा न देता प्रमाणपत्र मिळविल्याचे सांगितले जात आहे. असे मेडिकलवाले पनवेल,कामोठे,खारघर आदी भागात आपली औषध दुकाने थाटून असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.