मुंबई – भारतातला पहिला समुद्राखालचा बोगदा येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. मुंबई कोस्टल रोड या प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा होता. हा टप्पा जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचला आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. मरीन ड्राईव्हे ते वरळी- बांद्रा सीलिंक या टप्प्यातला ३ किमी लांबीचा हा बोगदा आहे.
या समुद्राखालील बोगद्याच्या खोदकामासाठी ३५ मजूर आणि मोठे चिनी बनावटीचे टनेल बोअरिंग मशीन वापरण्यात आले. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होणार आहे. अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी आणि मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा कोस्टल रोड यावर्षी नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या बोगद्याचे उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, मुंबई – अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या बुलेट ट्रेनने प्रवाशांना मुंबई ते ठाणे असा पाण्याखालून प्रवास करता येणार आहे. वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा असणार आहे. बीकेसी ते शिळफाटा असे जवळपास ३५ किमी इतके अंतर आहे. हा बोगदा पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.