मुंबई
गणेशोत्सवात मोठमोठ्या गणेश मूर्ती, विद्युत रोषणाई सजावट पाहण्यासाठी गणेशभक्त रात्रभर मुंबईत फिरत असतात. या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासन गणेशोत्सवाचे १० दिवस विशेष बस सेवा सुरू करणार आहे. त्यानुसार उद्यापासून २७ सप्टेंबरपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत २७ विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सायन, वरळी ते काळाचौकी, नागपाडा ते ओशिवरा, शिवडी ते दिंडोशी, पायधुनी ते विक्रोळी, नागपाडा ते शिवाजी नगर, म्युझियम ते देवनार, गिरगाव ते सँडहर्स्ट रोड स्थानक आणि म्युझियम ते शिवडी या विशेष बस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान या काळात पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.