मुंबईत पाळीव प्राण्यांवरही होणार आता सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

मुंबई – मानवी मृतदेहावर होणार्‍या अंत्यसंस्काराप्रमाणे आता लहान पाळीव आणि भटक्या प्राण्यांवरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता येणार आहेत. पालिकेने मांजर,श्वान आदी पाळीव आणि भटक्या प्राण्यांच्या अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करुन दिली आहे.नैसर्गिक वायू आधारीत दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले आहे.ही सेवा विनामूल्य असून मुंबईतील प्राणीमित्र आणि नागरिक यांनी लहान पाळीव प्राण्यांचा शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधी होण्यासाठी या सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.
मुंबई पालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून मालाड (पश्चिम)मधील एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ही दहन सुविधा करण्यात आली आहे.ही सुविधा १५ सप्टेंबर वापरासाठी सुरू झाली आहे.पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी याचा उपयोग करता येईल. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ही सुविधा विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा व सहजपणे उपयोग होईल. या दहन व्यवस्थेची पाच वर्षांची देखभाल आणि प्रचालन व्यवस्था आहे.५० किलो क्षमतेची नैसर्गिक वायू आधारित ही दहन व्यवस्था असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही,अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top