मुंबईत लवकरच 238 एसी लोकल

नवी दिल्ली – मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मुंबईत लवकरच 238 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजेदेखील नेहमीच बिघडत असतात. त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत.
मुंबईत लवकरच दाखल होत असलेल्या एसी लोकल या वंदे भारत एक्सप्रेसच्या श्रेणीतल्या असतील. या नवीन अपग्रेडेड लोकलसाठी रेल्वेला जवळपास 20 हजार कोटींचा खर्च येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. तर, कालांतराने मुंबईतील सर्वच लोकल वातानुकूलित करण्याचे रेल्वेचे टार्गेट आहे.
‘मेक इन इंडिया’ मार्गदर्शक तत्त्वांवर वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांना गारेगार अन् आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे बोर्डाने मुंबई उपनगरीय मार्गावर 238 वंदे भारत लोकल ट्रेनच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत 238 वंदे मेट्रो बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली.
याबाबतचे पत्रदेखील रेल्वे मंडळाने शुक्रवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला पाठवले आहे. या वंदे भारत लोकलचे तिकीट दर एसी लोकलप्रमाणेच जास्त असल्याने सर्वसामान्यांचा लोकल प्रवास मात्र महागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top