मुंबई – मुंबईत एका अल्पवयीन मुलीसमवेत लव्ह जिहादची घटना घडल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी आज ट्विट करीत व्हिडिओ जारी करून याची माहिती देत आरोप केला की, मुंबईतील भांडूप खिंडीपाडा येथील एका हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणार्या 24 वर्षीय सैफ खानने 13 वर्षे 8 महिने वयाच्या हिंदू मुलीला आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर तो तिला त्याच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी आझमगडला घेऊन गेला. पाच दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी सैफ आणि या मुलीचा शोध घेऊन त्यांना मुंबईत आणले. मुंबई पोलिसांनी सैफ खान याला अटक केली आहे. किरीट सोमय्या यांनी आज पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांची भेट घेतली.
किरीट सोमय्या यांनी सकाळी ट्वीट करून या प्रकरणाला वाचा फोडली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, भांडुपच्या खिंडीपाडा येथील अल्पवयीन हिंदू मुलीला 24 वर्षीय सैफ खानने फूस लावून आपल्या गावी आझमगडला नेले. मुलीच्या घराशेजारी सैफचे सलून होते. गावी गेल्यानंतर त्याने तिचा मोबाईल काढून घेतला. तिला घरात कोंडून ठेवले. मात्र या मुलीच्या हाती दुसर्या कुणाचातरी मोबाईल लागला. तिने आपल्या वडिलांना फोन केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची धरपकड केली. किरीट सोमय्या यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी लव्ह जिहादच्या बाबतीत कठोर कायदा करण्याची मागणी करत आहे. मी मुलीच्या वडिलांसोबत बोललो आहे. मुलाची आई आणि वडील यांचाही यात सहभाग असून, त्यांनी मुलीला आझमगडमध्ये नेण्याचे काम केले. त्यांनाही तातडीने अटक करावी.
सोमय्या यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यांच्या ट्वीटवर अनेक नेटकर्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची मागणी केली आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर ‘लव्ह जिहाद’चा निषेध आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांकडून विविध शहरांमध्ये मोर्चे आयोजित केले गेले. भाजपामधील अनेक नेत्यांनीही लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी केली आहे. ‘द केरला स्टोरी’नंतर ही मागणी जोर धरत असतानाच लव्ह जिहादची घटना किरीट सोमय्या यांनी मांडली आहे. यात किती सत्य आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
मुंबईत लव्ह जिहाद! 13 वर्षांच्या मुलीला फसवले! आझमगडला नेले! सोमय्यांच्या दाव्याने खळबळ
