मुंबई- मुंबईकरांच्या खाद्यजीवनाचा एक भाग बनलेल्या स्लाइस ब्रेडच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मैद्याच्या वाढत्या किमतीमुळे मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्स या तीन प्रमुख ब्रँडनी स्लाइस ब्रेडचे दर वाढवले आहेत. या दरात दोन ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. ३५०-४०० ग्रॅम वजनाच्या स्लाइस ब्रेडची किंमत आता ३५ रुपयांवरून ३८ रुपये झाली आहे. २०० ग्रॅमच्या मिनी ब्रेडची किंमत २० रुपये झाली आहे. तर ६०० – ६५० ग्रॅम वजनाचा ब्रेड पूर्वी ५२-५५ रुपयांना विकला जात होता. आता या ब्रेडची किंमत ६० रुपये झाली आहे. सँडविचसाठी वापरल्या जाणार्या ८०० ग्रॅम विब्स व्हाईट ब्रेडची किंमत ७० रुपयांवरून ७५ रुपयांपर्यंत गेली आहे. ब्राऊन ब्रेडच्या किमतीत वाढ झालेली नाही. अंधेरी (पूर्व) येथे मुख्यालय असलेल्या क्वालिटी कन्फेक्शनर्स अँड बेकर्सचे संचालक सलाहुद्दीन खान म्हणाले, “मैदाच्या ५० किलोच्या गोणीची किंमत १,५०० ते १,७०० रुपयांवर गेली आहे. इतर कच्चा मालही खर्चिक झाला आहे. त्यामुळे ब्रेडच्या किमतीत वाढ झाली आहे.
मुंबईत स्लाइस ब्रेड महागला
