मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा १०.७५ टक्क्यांवर आला आहे, तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा २९ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातूनअधिकचे पाणी मिळावे यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिले होते.
राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबई आणि उपनगरात मात्र कोरडाठाक आहे. अशातच पाऊस आणखी रखडल्यास जून महिन्यात मुंबईला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा १०.७५ टक्के, वैतरणा २९. ९१ टक्के, भातसा ३२.४८ टक्के, मोडक सागर ४७.९८ टक्के, तानसामध्ये ३६.९९ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा कमी आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.