इगतपुरी – कसारा घाट परिसरात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे.या पावसामुळे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. इगतपुरी ते नाशिकदरम्यानच्या ४५ किलोमीटरच्या रस्त्यांवर खोल आणि रुंद खड्डे पडले आहेत.
नाशिकहून मुंबईकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पाणी साचत आहे. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.त्यामुळे अपघात होत आहेत. नाशिकहून निघताना महामार्गावर गरवारेपासून खड्ड्यांना सुरुवात होते. वाडीवऱ्हे गावाच्या हद्दीतून महामार्ग पुढे विस्तीर्ण होतो. तेव्हा मोठ्या खड्यांनी रस्त्याची पार वाताहात झाल्याचे पाहायला मिळते. तेथे वाहनचालकांना अंदाज आला नाही तर अपघात हमखास होतो. नागरिकांनीही येथील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महामार्ग देखभाल,दुरुस्ती विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेतली गेलेली नाही.