मुंबई
भारतीय रेल्वे प्रशासनाकडून मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) -मडगांव दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली. पहाटे ५.५०च्या सुमारास सीएसएमटीहून ही गाडी मार्गस्थ झाल्यांनतर दुपारी १२.५० च्या दरम्यान मडगांव येथे पोहोचली, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली. इतर एक्सप्रेसना सीएसएमटीहून मडगावला पोहोचण्यास सुमारे ९ ते १० तासा लागतात. मात्र सेमी हायस्पीड अशा वंदे भारत ट्रेनने अवघ्या ७ तासात मडगांव गाठल्याने भविष्यात प्रवाशांचा दोन तासांहून अधिकचा वेळ वाचणार आहे. प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. देशातील विविध १४ मार्गावर हायटेक आणि अत्याधुनिक सेमी – हाय स्पीड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.