मुंबई- मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता तात्पुरत्या स्वरूपात दीर्घ मुदतीच्या रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या जागी किंवा रिक्त झालेल्या जागेवर आवश्यक असलेले शिक्षक तातडीने भरण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे; परंतु या शिक्षकांना प्रतितास दीडशे रुपयेप्रमाणे मानधन देण्यात येणार असल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत एकूण २४३ माध्यमिक शाळा चालवल्या जातात. या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२ पासून विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहेत. सध्या पालिकेच्या शाळांत ४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्या तुलनेने शिक्षकांची संख्या अपुरी पडू लागली आहे. शाळांमधील शिक्षकांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरणे आवश्यक असले, तरी नियमित भरतीप्रक्रियेस साधारण ६ ते ७ महिन्यांहून अधिक कालावधी लागणार आहे. मुख्याध्यापकांच्या अधिकाराचे विक्रेंद्रीकरण करण्याबाबत १९ ऑक्टोबर २०१९ रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार मुख्याध्यापकांमार्फत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करता येणार आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर माध्यमिक शाळांमधील १५० रिक्त जागांसाठी प्रतितास दीडशे रुपये मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये शिक्षकांना केवळ सहा तास सेवा बजावता येणार आहे. प्रतितास १५० रुपयेप्रमाणे महिन्याला २२ हजार ५०० मानधनावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.