मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबई, पुणे, नाशिक, कोकण आणि विदर्भात हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. तसेच तळाशी गेलेल्या धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी आज बंद करावा लागला. तर पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नाशिकमध्ये गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई उपनगराच्या कांदिवली, बोरिवली, मालाड येथील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरू होता. या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. कल्याण, डोंबिवलीत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात वाढ होणार असल्यामुळे मुंबईकरांना आता दिलासा मिळाला असून, मुंबईवरचे पाणीकपातीचे संकट कमी झाले.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे आज सिडको, सातपूर आणि शिंगाडा तलाव भागात झाडे कोसळली. यात कुठलीही जिवितहानी झाली नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. सिडकोतील मोरवाडी अमरधाम, विजयनगर भागात रस्त्यावरील पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. पेठ, म्हसरुळला जोडणाऱ्या कॅनॉल रस्ता, कर्णनगर यासह अनेक प्रमुख रस्ते व चौकांत रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करणे अवघड झाले होते. येथील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top