मुंबई मेट्रो ‘२ ए’ व ७ च्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह

मुंबई

मुंबई मेट्रोचे ‘२ ए’ व ७ हे मार्ग आता वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. या नवीन स्थानकांत भर पावसाळ्यात गळतीची समस्या उध्दभवली आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबई मेट्रो २ ए मार्गावर दहिसर पूर्व ते अंधेरी (प) व मेट्रो ७ हा मार्ग दहिसर पूर्व ते गुंदवली दरम्यान आहे. या दोन मार्गिकांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) केली आहे, तर परिचलन व देखभाल ही महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमएमओसीएल) केली जाते. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गळतीची व्यथा मांडली आहे.

दहिसर (पू) मेट्रो स्थानकात अनेक ठिकाणी गळती होत आहे. या स्थानकात बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग व गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर छतच टाकलेले नाही, अशा तक्रारी काही प्रवाशांनी केल्या आहेत. मेट्रो स्थानकात होणारी गळती एमएमआरडीए व एमएमएमओसीएलच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर या दोन्ही संस्थांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘खुल्या असलेल्या दर्शनी भागामुळे स्थानकांमध्ये पाणी शिरते आणि भिंती ओलसर होतात. आम्हाला या समस्येची पूर्ण जाणीव असून ती सोडवण्यासाठी काम करत आहोत. आमचे कर्मचारी स्थानकांमध्ये कोणत्याही गळती किंवा प्रवेशाचे ठिकाण ओळखण्यासाठी नियुक्त केलेले आहेत.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top