मुंबई – आता मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. मध्य रेल्वे विभागाने त्यासाठी लोकल ट्रेनमध्ये एएडब्ल्यूएस अॅडव्हान्स ऑक्सिलरी वॉर्निंग सिस्टीम बसवली आहे. ही यंत्रणा ट्रेनने वेगमर्यादा ओलांडल्यास आधी मोटरमनला सतर्क करेल आणि मोटरमनकडून प्रतिसाद न मिळाल्यास आपोआप ब्रेक लागेल,अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवाजी मानसपुरे यांनी दिली.
डॉ.शिवाजी मानसपुरे यांनी सांगितले की, एएडब्ल्यूएस यंत्रणेत दोन महत्त्वाचे भाग आहेत. यातील एक यंत्रणा रेल्वे मार्गात तर दुसरी मोटरमनच्या केबिनमध्ये असेल. या यंत्रणेद्वारे सिग्नलच्या रंगावरून ट्रेनचा वेग निश्चित केला जाईल. लोकलचा वेग सेंट्रल रेल्वे मार्गावर १०५ तर हार्बर मार्गावर ८० किलोमीटर प्रतितास असेल. ट्रेनने आपली वेगमर्यादा ओलांडल्यास ही यंत्रणा आधी मोटरमनला सतर्क करेल आणि मोटरमनचा प्रतिसाद मिळाला नाही, तर आपोआप ब्रेक लावला जाईल. तत्काळ ब्रेक लावल्यास ट्रेन जास्तीत जास्त १०० मीटरपर्यंत पुढे जाईल. विशेष म्हणजे, वेग कमी झाल्यावर आपोआप स्वयंचलित ब्रेक सोडले जाणार आहेत. बरेच अपघात सिग्नल ओलांडल्याने घडले आहेत. त्यामुळे आता या यंत्रणेमुळे असे धोका टळून जाऊन प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.