मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या उद्देशाने आणलेली दुर्मिळ कासवे जप्त करण्यात आली आहेत. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ दुर्मिळ जातीची ही कासवे जप्त करुन ती त्यांच्या मूळ देशात परत पाठवली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांची किंमत प्रत्येकी २०० ते २५० डॉलर असल्याचे सांगण्यात येते.आज मुंबई विमानतळावर थायलंडच्या बँकॉक इथून आलेल्या एका प्रवाशाने ही कासवे आणली होती. त्याच्या जेवणाच्या डब्यात ही कासवे लपवली होती. कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली असता ही कासवे सापडली. यातील ८ कासवे ही जपानी पाँड टर्टल असून ४ स्कॉरपिअन मज टर्टल या जातींची आहेत. ही सर्व कासवे त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात आली आहेत.
