महाराष्ट्राला पहिली महिला
मुख्यमंत्री कधी मिळणार?
फोटोची चौकट रिकामी आहे. यामागे एक कारण किंवा मोठी खंत आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. आसामपासून ओडिशापर्यंत आणि काश्मीरपासून उत्तर प्रदेशपर्यंत राज्यांत महिला मुख्यमंत्री बनल्या असल्या तरीही महाराष्ट्रात एकाही महिलेला या खुर्चीत बसण्याचा मान मिळालेला नाही. कायम पुरोगामीत्वाचा झेंडा मिरवणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि देशात सर्वप्रथम महिला धोरण राबवणाऱ्या महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री नाही, ही गोष्ट खचितच भूषणावह नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची क्षमता असलेल्या महिला झाल्याच नाहीत, असे नाही. काही जणींची नावेही चर्चेत आली. परंतु त्यांना ही संधी मात्र कधीच मिळाली नाही.
1978 मध्ये पुलोद (पुरोगामी लोकशाही दल)चे सरकार बनले, तेव्हा मृणाल गोरे यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु बेरजेच्या राजकारणापासून मृणाल गोरे कायम लांब राहिल्या. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जसे पुढे आले, तसे मागेही पडले. प्रेमलाताई चव्हाण, शालिनीबाई पाटील, प्रतिभा पाटील, प्रभा राव यांची नावेही त्या काळात मुख्यमंत्रिपदासाठी घेतली गेली. परंतु मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्याही गळ्यात पडली नाही. यात मुख्यमंत्रिपदाच्या सगळ्यात जवळ जाणाऱ्या म्हणून काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे नाव घ्यावे लागेल. 1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी राज्यातील शरद पवार यांचे पुलोद सरकार पाडले. त्यानंतर राज्यात नव्याने निवडणुका होऊन त्यात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीत शालिनीताई पाटील यांचे नाव चर्चेत होते, पण शालिनीताई यांच्या नावाला खुद्द त्यांचे पती वसंतदादा पाटील यांनीच विरोध केला. याचा किस्सा त्यांनी स्वतःच सांगितला आहे. वसंतदादांनी हायकमांडला सांगितले की, शालिनीताईंचे दुसरे लग्न झाले आहे. त्यामुळे मराठा समाज त्यांचे नेतृत्व स्वीकारणार नाही. शालिनीताईंना राज्यकारभार चालवण्याचा अनुभवही नाही. त्यामुळे शालिनीताई यांचे नाव मागे पडून बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव पुढे आले. पुढे शालिनीताईंनी राज्याचे महसूल मंत्रिपद भूषवले. परंतु त्यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली ती हुकलीच. प्रेमलाताई चव्हाण आणि प्रभा राव ही महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठी नावे. दोघींनीही अनेक पदे भूषवली. अगदी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही भूषवले. परंतु काँग्रेसच्याअंतर्गत राजकारणाने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची संधी नाकारली. प्रतिभा पाटील तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या, पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाने त्यांनाही हुलकावणी दिली. शरद पवार यांनी प्रतिभा पाटील यांच्या सत्काराच्या एका कार्यक्रमात अशी कबुली दिली होती की, राजीव गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बोलावल्याने प्रतिभा पाटील यांची मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली.
गेल्या काही वर्षांत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आले. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे त्यांनी एकदा जाहीरपणे म्हटले होते. पण त्यानंतर त्यांची पडती सुरू झाली. राजकीय वर्तुळातून काही त्या बाहेरच फेकल्या गेल्या. आता पुन्हा त्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघतील का, ही शंका आहे. म्हणजे काँग्रेसकाळात जे होत होते, तेच भाजपाच्या राजवटीत झाले.
आता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर तरी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का, अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. काँग्रेस नेत्या खा. वर्षा गायकवाड यांनी या चर्चेला फोडणी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे किंवा ठाकरेंच्या रश्मी ठाकरे असे काही महिला मुख्यमंत्र्यांचे चेहरे मविआकडे आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्याच्या राजकारणात थेट भाग घेतलेला नाही. अजित पवार राज्यात आणि सुप्रिया सुळे दिल्लीत असेच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडले आहे. परंतु आता पवार कुटुंबातच फूट पडली आहे. अजित पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून पवार गटाच्या अघोषित वारसदार त्याच बनल्या आहेत. राज्याच्या राजकारणात त्या येऊही शकतात. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात त्या घरचे कार्य असल्यासारख्या सक्रिय होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपदाची क्षमता त्यांच्यात आहे.
