मुंबई- काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र या भेटीबाबत पवारांनी ट्विट करून आपण मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो, असे स्पष्ट केले आहे.
पवारांनी सायंकाळी अचानक वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी 40 मिनिटे चर्चा केली. मात्र निघताना त्यांनी या भेटीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. त्यानंतर या भेटीबाबत त्यांनी एक ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, मराठा मंदिर अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्त संस्थेतर्फे वर्धापन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या सोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य,व कलाक्षेत्रातील कलावंत कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य,लोककला, वाहिन्या, व इतर मनोरंजन माध्यमातील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली, असे त्यांनी ट्विट केले आहे.
मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो! ‘वर्षा’ वरील भेटीबाबत पवारांचा खुलासा
