मुरुड-जंजिरा – रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली गावात असलेल्या पुरातन श्रीराम मंदिराचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे मंदिराचे काम आता पूर्णत्वास जाणार आहे.
भाजपचे नेते आणि माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी या मंदिराचे रखडलेले काम करण्यासाठी लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन येथील ग्रामस्थांना दिले आहे. तसेच त्यांनी त्यासाठी रोख २ लाख रुपये ग्रामस्थांकडे सुपूर्दही केले.
उसरोली गावच्या ग्रामस्थांनी भाजपचे मुरुड तालुका उपाध्यक्ष स्वप्निल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप भोईर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी भोईर म्हणाले की, या मंदिराच्या बांधकामांसाठी मी स्वतः लक्ष घालणार असून हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल आणि याठिकाणी अत्यंत सुसज्ज मंदिर उभारले जाईल. हे पुरातन राममंदिर ठाकूर कुटुंब खारीकवाडा यांचे असून पंचक्रोशीतील समाजाने आर्थिक मदत करूनही या मंदिराचे काम अपूर्ण राहिले. ते आता दिलीप भोईर यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होण्याची आशा ग्रामस्थांना वाटत आहे.