मुंबई – मनी लाँड्रिंगप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरोधात हसन मुश्रीफ यांनी आज मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी तातडीच्या सुनावणीसाठी केलेली विनंती हायकोर्टाने मंजूर केली. गुरुवारी मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने ईडी तपास करत असलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी मुश्रीफांना 14 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनीलाँड्रिंगचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हसन मुश्रीफ यांचा यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. मुश्रीफ यांनी 2011 मध्ये मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत स्थानिक शेतकर्यांना विश्वासात घेऊन पैसे जमा केले होते.38 कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा करण्यात आली होती. या रकमेतून साखर कारखाना सुरू करून शेतकर्यांना शेअर्स देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. ते पैसे मुश्रीफांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले,असा आरोप करण्यात आला.
मुश्रीफ हायकोर्टात! आज सुनावणी
