मेक्सिको
परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाने अजून कोणताही ठाम पुरावा सादर केलेला नाही. पण जगभरात अनेक वेळा उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे अनेकांकडून केले जातात. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील संसदेत काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. तर आता मेक्सिकोच्या संसदेतही याच विषयावरील सुनावणी झाली आहे. या सुनावणी दरम्यान संसदेत दोन परग्रवासीयांच्या प्रेतांचे अवशेष सादर करण्यात आले. हे मृतदेह एक हजार वर्षांपूर्वीचे असून ते पेरु या देशामधील एका खाणीत सापडले होते. मेक्सिकोचे पत्रकार आणि यूरोलॉजिस्ट जेमी मौसम यांनी हे दोन परग्रवासीयांचे मृतदेह संसदेत सादर केले. हे मृतदेह एका लाकडी पेटीत ठेवण्यात आले आहेत.
पत्रकार जेमी मौसन म्हणाल्या, ‘हे नमुने आपल्या जगाच्या उत्क्रांतीचा भाग नाहीत. ते यूएफओ भंगारातून परत मिळाले नाहीत. डायटॉम मॉस खाणीत त्यांचे जीवाश्म सापडले. विशाल विश्वात आपण एकटे नाही आहोत, हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे.’
परग्रहवासीयांच्या मृतदेहांवर ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमध्ये संशोधन करण्यात आले आहे. यावेळी वैज्ञानकांनी या मृतदेहांच्या डीएनएचे नमूने तपासत त्यांचे विश्लेषण केले. संसदेत या सुनावणीवेळी अमेरिकेतील माजी नौदल पायलट रायन ग्रेव्स सुध्दा उपस्थित होते. आधी त्यांनीही अमेरिकन संसदेत दावा केला होता की त्यांनी पायलट म्हणून सेवा बजावत असताना परग्रहवासीयांना पाहिले होते, अशी माहितीही मौसन यांनी दिली.