मेक्सिको :
पश्चिम मेक्सिकोमध्ये शनिवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले. ही बस पर्यटकांना घेऊन शेजारच्या राज्यात जात होती. नागरी संरक्षण अधिकारी पेड्रो नुनेझ यांनी सांगितले की, बस अपघातात ११ महिला आणि ७ पुरुषांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये किमान ११ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
अपघातावेळी बस जॅलिस्को या शेजारील राज्यातील ग्वाडालजारा येथून २२० किलोमीटर अंतरावर होती. पर्यटकांना घेऊन जाणारी बस अचानक रस्त्यावरून दरीत कोसळली. बसमधील अपघातग्रस्त सर्व प्रवासी मेक्सिकन नागरिक असल्याचे नुनेझ यांनी सांगितले. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. त्याचबरोबर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.