वॉशिंग्टन : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सएपची मूळ कंपनी मेटा १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. मेटाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात सुरू करणार असल्याचे सूचित केले आहे. यामध्ये, किमान ४,००० उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाऊ शकते, असाही इशारा देण्यात आला आहे. मेटाने यापूर्वीही तीन हजारहून अधिक कर्मचार्यांची कपात केली आहे.
मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच एक अहवाल जारी केला आहे. मेटा आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नोकर कपात करणे गरजेचे असल्याने येत्या काही महिन्यांत कंपनी १०,००० नोकऱ्या कमी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. एका अहवालानुसार, या आठवड्यात मेटा आपल्या ४,००० उच्च पदस्थ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. यापूर्वीच मार्चमध्ये, झुकेरबर्ग यांनी टाळेबंदीचे संकेत दिले होते. त्यानुसार, झुकेरबर्ग यांनी येत्या काही महिन्यांत टप्प्याटप्प्यांत नोकर कपात करून अतिरिक्त १०,००० कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली होती. १०,००० कर्मचार्यांना काढून टाकल्यानंतर कंपनीमध्ये ५,००० पदे रिक्त ठेवली जातील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील वाढलेले व्याजदर आणि जगातील वाढती अस्थिरता कंपनीच्या नफ्यावर परिणाम होण्यास कारणीभूत ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
काढण्यात येणार्या कर्मचार्यांना १६ आठवड्याचा पगार आणि सेवेतील प्रत्येक वर्षीच्या दोन आठवड्यांचा अतिरिक्त पगार दिला जाणार आहे. तसेच कुटुंबासाठी सहा महिने आरोग्य विमा कायम राहाणार आहे.